मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – सोसाट्याच्या वाऱ्याने हिंगोली येथील नूतन बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बस स्टॅन्ड मधील एक सिलिंग फॅन पडून दोन ते तीन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.
28 मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसादरम्यान वारा एवढा होता दहा फुटावरील कोणतेही वाहन अथवा व्यक्ती धुळीने दिसत नव्हता.
या वादळी वाऱ्याने हिंगोली येथील नूतन बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे. याने अद्यावत करण्यात आलेल्या या बस स्थानकाच्या बांधकामावर संशय येऊ लागला आहे.
या वादळी वाऱ्याने बस स्थानकातील अद्यावत पत्रे कोसळली असून सीलिंग फॅनही तुटून पडला आहे. यामध्ये दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; मात्र सदरील प्रवाशांनी येथे अधिक वेळ न थांबता ते आपल्या पुढील प्रवासात तसेच निघून गेले. या बस स्थानक बांधकामावर लाखो रुपयांचा निधी खर्च झालेला असून बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
विशेष म्हणजे पुढील महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते औंढा नागनाथ येथील नूतन बस स्थानकाचा वाढ विस्तार कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केलेला आहे.
या सोहळ्याआधीच हिंगोली बस स्थानकाच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. बस स्थानकाच्या झालेल्या सर्व कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
काही ठिकाणी झाडे कोसळली
रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात शहरातील अनेक काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या रस्त्यावर येऊन पडल्या शहरातील नांदेड नाका, अग्रेसर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. तसेच शहरात लावण्यात आलेले मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनरही तुटून पडले.