मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरालगत असलेल्या खटकाळी महादेव मंदिर येथील पुजाऱ्यावर 25 जानेवारी रोजी मध्यरात्री दरोडा टाकून व पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या आरोपींच्या हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहेत. या आरोपींकडून एक पिस्तल तीन जिवंत काडतूस व सोन्याचे दागिन्यासह तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
25 जानेवारी रोजी मध्यरात्री हिंगोली शहरालगत असलेल्या खटकाळी येथील महादेव मंदिरातील पुजाऱ्यावर मध्यरात्री दरोडा टाकून व पिस्टल चा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेल्याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना योग्य त्या सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले होते.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसराचा व असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन नमूद गुन्हे करणारी टोळी बाबत माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी ओमसाई शिवाजी खरात, प्रदीप उत्तमराव गायकवाड दोन्ही (रा. गंगानगर तालुका जिल्हा हिंगोली), कैलास शिवराम देवकर (रा. गांधीनगर गोरेगाव), अंकुश जालिंदर गायकवाड (रा. इंदिरानगर हिंगोली), राहुल विठ्ठल धनवट (रा. सावरखेडा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा) यांनी मिळून खटकाळी मंदिरावरील पुजाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून दागिने मोबाईल व व नगदी रुपये लुटून आपसात वाटून घेतल्याचे सांगितले.
यातील आरोपी अंकुश गायकवाड यांनी दरोडा टाकतेवेळी वापरलेली पिस्टल ही ओम साई शिवाजी खरात यांच्याकडून घेऊन सदरचा गुन्हा करून परत ओमसाई कडे दिली होती. सदर पिस्टल ही आरोपी ओमसाई यास विशाल सांगळे याने एका वर्षापूर्वी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील अटक आरोपींकडून तपासा दरम्यान एक पिस्टल तीन जिवंत काडतूस किंमत अंदाजे 30 हजार रुपये, सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 1 लाख 80 हजार रुपये, मोटार सायकल किंमत अंदाजे 1 लाख रुपये, तसेच मोबाईल 14 हजार रुपये असा एकूण तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लोकुळे, भगवान आडे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, चालक प्रशांत वाघमारे व शेख जावेद यांनी केली.
तसेच सायबर सेलचे प्रमोद थोरात, रोहित मुदीराज, दीपक पाटील यांनी सदरचा गुन्हा उघड करून गेलेला माल जप्त केल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन केले आहे.