मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींना पुणे जिल्ह्यातून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. हे आरोपी घटना घडल्यापासून फरार होते. अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना ते गुंगारा देत होते.
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्यासाठी हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक योजना आखली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे व हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध पदके स्थापन करण्यात आले.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक मागील पाच दिवसापासून मध्य प्रदेश व पश्चिम महाराष्ट्रात आरोपीचा कसून शोध घेत होते.
पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाल्यावरून गोळीबार प्रकरणातील पिस्टल हे मध्यप्रदेश मधून आले असून पिस्तूल पुरवठादार हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील देहूगावामध्ये आला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देहूगावात जाऊन गोपनीय माहिती काढून सदर पुण्यातील पिस्टल पुरवठा करणारा आरोपी नामे सतीश बाबुलाल कुशवाह या ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस पथकाने अक्षय इंदोरियाकडे मोर्चा वळवला.
पुन्हा पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, अक्षय इंदोरिया व ओम पवार हे जेलमध्ये असताना मित्रांसोबत पुणे ग्रामीण हद्दीत भिगवन या गावी आहे, अशी माहिती मिळाली. यावरून पोलीस पथकाने भिगवन येथे शोध घेतला असता नमूद आरोपी भिगवन येथून बारामतीला पळून गेल्याचे कळाले.
या अनुषंगाने पोलीस पथकाने तात्काळ बारामती येथे जाऊन झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम घेतले असता आरोपी झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे व त्यांच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करून आरोपी अक्षय गुरुदत्त इंदुरिया व ओम गजानन पवार यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागी पोलीस अधिकारी देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे किशोर कातकडे, सुनील अंभोरे, शेख बाबर, शेख, नितीन गोरे, जावेद, गणेश लेकुळे, किशोर सावंत आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे तुषार ठाकरे, दत्तात्रेय नागरे, इरफान पठाण यांनी केली.