मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून भर उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना सहा – सहा, सात- सात दिवसात तर काही भागातील नागरिकांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यावर एप्रिल महिन्यात बे मोसमी पावसाचे ढग येऊन अवकाळी पाऊस झाला. यावेळी सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला.
याने काही ठिकाणी महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळल्याचे दिसून येते; मात्र हे विद्युत खांब पडल्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचे काम महावितरण कार्यालयाकडून युद्ध पातळीवर केले जाते व विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो.
सदरील बाबीने हिंगोली नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील अनेक भागांना नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
विद्युत खांब रोवण्याचे काम समजा दोन दिवसाचे गृहीत धरले तरी तीन दिवसाआड मिळणारे पाणी समजा पाच दिवसांनी मिळू शकले असते; मात्र नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मनमानी कारभार केला जात आहे.
शहरातील बहुतांश भागांना महावितरण कडून वीज नसल्याचे कारण पुढे करून सहा – सहा ते सात – सात दिवस पाणीपुरवठा केला जात नाही.
तसेच काही भागांना दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला गेलेला आहे. या भागांना दहाव्या दिवशीच पाणीपुरवठा जाणून बुजून केल्याची बाब या वरून दिसून येते. तसेच पाणीपुरवठा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.
सध्या मे महिना सुरू असून अवकाळी पावसाचे ढग जमा होतच आहेत. उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळत असला तरी थोड्याशा पावसाने व वादळी वाऱ्याने किती दिवस पाणीपुरवठा होणार नाही, याची भीती नागरिकांना जाणवू लागली आहे.
नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांनी सदरील बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारावा. तसेच नागरिकांना कमीत कमी चार दिवसाआड तरी पाणीपुरवठा केला जाईल याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.