मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील महावितरण कंपनीकडून शहरातील विविध ग्राहकांना फॉल्टीमीटर देऊन प्रत्येक नागरिकाकडून हजारो रुपयांचे बिल वसूल केले जात आहे. सध्या मार्च एंड असून वीज बिल वसुली जोरात सुरू असल्याचे दिसते. या प्रकारामुळे मात्र ग्राहकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महावितरण च्या हिंगोली कार्यालयाकडून सध्या ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. असा प्रकार घडत असताना महावितरणचे अधिक्षक अभियंता तथा संबंधित उपअभियंता यांच्याकडे या प्रकाराकडे लक्ष देण्या इतपत मार्च एंडिंगच्या वसुलीने वेळ नसल्याचे दिसते. त्यामुळे हजारो रुपयांचे चुकीचे बिले ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याचे चित्र सध्या आहे.
हिंगोली शहरातील एनटीसीसह वेगवेगळ्या भागातील बाजारपेठ आणि गृहस्थांना महावितरण कडून एका – एका महिन्याचे हजारो रुपयांचे बिले दिली जात आहेत. विशेष म्हणजे सदरील बिले हे फॉल्टीमीटरमुळे आल्याचे बाजारपेठ येथील काही दुकानदारांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील फॉल्टीमीटर बदलून देण्याबाबत महावितरण कडे अर्ज केलेले आहेत, परंतु अर्ज देऊन तीन – तीन महिने उलटले तरीही महावितरण कडून फॉल्टीमीटर बदलून दिले जात नसून दर महिन्याला हजारो रुपयांची बिले ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत आणि वीज बिलाच्या वसुलीसाठी या ग्राहकांच्या मागे महावितरणचे कर्मचारी लागलेले आहेत.
या अधिकारी – कर्मचाऱ्यांना हे ग्राहक फॉल्टीमीटर असल्याचे लक्षात आणून देत असून आपण याबाबत मीटर बदलून देण्यासाठी अर्ज केल्याचे सांगूनही त्यावर कोणतेच कार्यवाही न करता हे अधिकारी – कर्मचारी निव्वळ वसुली करत फिरत आहेत. तसेच ग्राहकांचे काहीही एक ऐकून न घेता विज बिल न दिल्यास वीज पुरवठा खंडित करू अशी धमकीही देत आहेत. त्यामुळे हे ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले असून आपल्या अडचणी महावितरण कंपनी ऐकत नसल्याच्या भावना ग्राहकांतून उमटत आहेत. तसेच तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे.
या सर्व प्रकाराकडे विभागीय कार्यालयाकडून लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी आणि फॉल्टी वीज मीटर बदलून न देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही या ग्राहकांतून व्यक्त होत आहे.