मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठीची प्रक्रिया गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नामांकन अर्ज दाखल करणे ते मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे.
दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा तसेच संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली.