मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मागील सहा महिन्यापासून वसमत ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपीचा हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका महिन्याच्या आत यशस्वीरित्या शोध घेतला आहे.
जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांबाबत कठोर धोरण राबवत हद्दपार, प्रतिबंधक कार्यवाही तसेच विशेष कोंबिंग ऑपरेशन आदींच्या माध्यमातून धडाकेबाज कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा तसेच गुन्ह्यातील पीडित व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध याबाबत सुद्धा तपास पथकांना विशेष सूचना देऊन कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाणे मध्ये बालकांसंबंधाने दाखल कलम 363 अपहरणाचे जे गुन्हे प्रलंबित आहेत.
ज्या गुन्ह्यांना चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे,अशा गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यातील पीडित व आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याचा लवकर निपटारा व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षात अशा गुन्ह्यांना तपासासाठी विशेष पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक केली आहे, अशा बालकांचे अपहरणासंबंधी दाखल गुन्हे ज्यांना चार महिन्याचा कालावधी झालेला आहे.
सदर गुन्ह्यांचा जलद तपासासाठी ते गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केले जातात.
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात 30 मे 2022 रोजी फिर्यादी महिला (रा. इंजनगाव तालुका वसमत) यांच्या तक्रारीवरून त्यांच्या सतरा वर्षीय मुलीचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले अशी तक्रार वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि अन्वये दाखल झाली होती.
गुन्ह्याच्या तपासात वसमत ग्रामीण पोलीस ठाणे पथकाने नमूद गुन्ह्यातील पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले होते. नमूद गुन्ह्याचा तपास 10 नोव्हेंबर 2022 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.
सदर कक्षातील तपास पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास अतिशय जलद गतीने करून गोपनीय बातमीदार व सायबर सेल यांच्या मदतीने 21 डिसेंबर 2022 रोजी अर्थक प्रयत्न करून गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपी यांना नांदेड येथून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.
तसेच गुन्ह्याच्या पुढील सखोल तपासणी नमूद पीडित मुलगी व आरोपी यांना वसमत ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे, पोलीस अंमलदार गजानन बर्गे, महिला पोलीस अंमलदार नंदा घोंगडे व गोकुळा बोलके सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष हिंगोली व सायबर सेलचे पोलीस अंमलदार रोहित मुदीराज यांनी केली.