मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात दरोडा व घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सदरील आरोपीकडून 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत मागील वर्षी 8 फेब्रुवारी रोजी गजानन कृषी बाजार येथे काही अज्ञात आरोपींनी दरोडा टाकला होता.
सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे संजय उर्फ समीर पंडित नामनूर (रा. मदिना नगर कळमनुरी (हल्ली मुक्काम मेहबूबनगर नूरी मोहल्ला नांदेड) हा मध्यवर्ती कारागृह नांदेड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास प्रोड्यूस वॉरंटद्वारे सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयाकडून आरोपीचा पीसीआर काढण्यात आला होता.
सदर तपासा संदर्भात हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी तपासीक अधिकारी यांना बारकाईने तपास करण्याबाबत सूचना देऊन हिंगोली जिल्ह्यातील इतर घरफोड्या गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यावरून तपासीक अधिकारी व पथक स्थानी गुन्हे शाखा हिंगोली यांनी सदर आरोपीकडे बारकाईने तपास करून त्याचे इतर साथीदार निष्पन्न केले.
तसेच आरोपीने हिंगोली जिल्हा हद्दीत केलेल्या घरफोडीतील एकूण 8 गुन्ह्यातील सोन्या-चांदीचा एकूण किंमत 4 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.
ही कारवाई हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, शेख शकील, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, तुषार ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केले.
सदरील आरोपीकडून एकूण 8 गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याचा बारकाईने तपास केल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन केले.