मृत प्रतिक्षा श्रावण चव्हाण, पृथ्वीराज श्रावण चव्हाण
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – शेततळ्यात पडून दोन चिमूरड्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे घडली. ही दोन्ही मुले सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनंगाळे येथील ऊसतोड मजुराची आहेत या दुर्दैवी घटनेने बोरखेडी पिन गाडे गावावर शोककळा पसरली आहे.
सध्या महागाई आणि बेरोजगारीच्या बिकट प्रश्नाने अनेक कुटुंबावर आपल्या गावापासून परागंधा होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील अनेक कुटुंब अशी परागंधा होऊन हाताला काम मिळण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी मोठमोठ्या शहरांसह ऊस तोडीच्या कामावर स्थलांतरित झालेली आहेत होत आहेत.
त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फिरते शाळा ही संकल्पना शासनाकडून राबविली जात असली तरी अनेक शाळा ह्या कागदोपत्रीच केवळ निधी लाटण्यासाठी चालविल्या जातात विभाग चौकशी केल्यास पुढे येईल.
यात निधी घेण्यापुरता जसा शाळेचा वाटा असतो तसाच बिले पास करून परसेंटेज घेण्याचा तेवढाच वाटा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा असतो ही बाब सांगावयास नको. अशा या भ्रष्ट प्रकाराने आणि सोलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने ह्या शाळा कुठे आहेत याची कल्पना येईल.
सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील श्रावण आसाराम चव्हाण व यांचे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी ऊस तोडीच्या कामासाठी गेले होते, मात्र काळाने अचानक त्यांच्या कुटुंबावर घालाघातला 22 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चव्हाण व त्यांची पत्नी हे ऊस तोड तोडून गाडी भरण्याचे काम करत होते. त्यांची लहान मुले प्रतीक्षा श्रावण चव्हाण (वय 7) व तिचा भाऊ पृथ्वीराज श्रावण चव्हाण हे शेतात खेळत होते.
अचानक प्रतीक्षा ही चिमुरडी खेळता – खेळता पडली. तिच्या मागे तिचा भाऊ पृथ्वीराज हा देखील शेततळ्यात पडला. यामध्ये या दोन्ही चिमूरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपली दोन्ही मुले शेत तळ्यात पडल्याचे समजताच चव्हाण दाम्पत्याने शेततळ्याकडे धाव घेतली.
या दोन्ही चिमूरड्यांना उपचारासाठी करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी देण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सेवाविच्छेदन केल्यानंतर या दोन्ही चिमुरड्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी बोरखेडी येथे आणण्यात आला. येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने बोरखेडी पिन गाळे या गावावर शोककळा पसरली आहे.