दर्पण – विशाल वसंतराव मुळे – आजेगांवकर
पाहून शौर्य तुझं पुढे, मृत्यूही नतमस्तक झाला|
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभु अमर झाला||
आज फाल्गुन अमावस्या आहे आजच्या दिवसाला शंभु प्रेमी “मृत्युंजय अमावस्या” असं म्हणतात, चाळीस दिवसाच्या यमयातना, निर्भित्सना ज्या छञपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या धर्मकार्यासाठी अविरत स्वीकारल्या त्यांची आज ह्याच दिवशी धर्मासाठी आहुती पडली. शंभू राजेंची पडलेली आहुती आम्हा महाराष्ट्रीय तरुणांसाठी सदैव प्रेरणा घेऊन ह्या राष्ट्रासाठी सदैव तत्पर राहील अशी आजची स्थिती आहे. इतिहास हा सदैव तेवत ठेवावा लागतो. आणि हा बलिदान मास तेच कार्य मोठ्या ऊर्जेने करतो आहे. शंभूचे धर्मशौर्य स्मरण करीत कृतज्ञ अंतःकरणाने आणि जड मनाने नमन करतो…
धर्मवीर छञपती संभाजी महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित, छावा ह्या चित्रपटाने आम्हाला काय दिले? तथाकथित हिंदू विरोधी घटकाला दूर केले. खोटे शंभु भक्त उघडे पडले. केवळ एखाद्या विशिष्ठ जातीच्या विरोधात आणि विशेषतः हिंदू संस्कृतीच्या विरोधात चालणारे अजेंडे काही तासात उद्ध्वस्त झाले. एका शिल्लक राहिलेल्या पक्षाचा माजीमंत्री असलेल्या आमदाराने “आम्हीच शिवाजी महाराजांना हिंदूंच्या बाहेर काढले” असे धक्कादायक आणि तितकेच खरे विधान केले आहे. ह्यांनी भारतीय संस्कृती संपविण्याचाचा विडा घेतलेला आहे. मुळात ही मंडळी भारताच्या विरोधात काम करणारी आहे. ह्यांची ‘इको सिस्टिम’ ही ह्याच भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. परंतु मागील दहा वर्षापासून भारत आणि विशेष करून महाराष्ट्रीय तरुण आता परत योग्य इतिहासाची माहिती घेत आहे. खरा इतिहास समजून घेत आहे. छावा चित्रपटाच्या नंतर बलिदान मास पाळणाऱ्या हिंदू तरुणांची संख्या लक्षावधीने वाढली आहे. आमचा तरुण सत्य आणि समर्पण समजून घेत आहे. ह्या स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे शौर्य आणि धर्म समर्पण लक्षात घेत आहे…
महाराष्ट्रातील तरुण ‘धारकरी’, वारकरी, हिंदुविर तरुण फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा तीस दिवसाचा काळ शंभु राजांच्या स्मरणात घालवतो. चाळीस दिवस अनन्वित अत्याचार सहन करणारा माझा राजाने देव, देश आणि धर्म सोडला नाही ह्याची साक्ष देणारा हा महिना आहे. शंभू राजांच्या ह्या धर्म शौर्याला आजचा तरुण नतमस्तक होतो. स्वतःच्या घरातील एखादा करता व्यक्ती निधन पावल्यावर जो शोक घरात असतो तसाच शोक ह्या तीस ते चाळीस दिवसात शंभु भक्त करत असतात. एक प्रकारे हे भक्त सुतक पाळत असतात. ह्या बलिदान मासामुळे आजच्या आमच्या पिढीला शंभु यातना स्मरतात आणि ते त्या पद्धतीने त्याचे पालन करतात.
माझं स्वतःचं हे यंदाच बलिदान मासाचं बाराव वर्ष आहे. ह्या अगोदर बलिदान मास हा फारसा कुणाला माहिती नव्हता असं नाही, पण ह्या माध्यमातून आमच्या सारख्या तरुणाच्या ह्या स्थितीला काही मंडळी हसत असत. संभाजीराव भिडे गुरुजींनी महाराष्ट्रातील तरुणांना कर्मकांडाकडे वळवले असाही आरोप ही धर्मद्रोही मंडळी करत असे. पण एका छावा चित्रपटाने ह्यात इतकं मोठं परिवर्तन केलं की आज आम्ही तरुण अभिमानाने सांगतो, होय! आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या शौर्य स्मरण प्रित्यर्थ हा बलिदान मास पाळतो. हा बलिदान मास पाळत असताना क्षणा क्षणाला आम्ही शंभु चरित्राच निर्वहन करत असतो. इतिहास पोचट असून चालत नाही, किंवा इतिहास पुळचट असूनही चालत नाही, त्याच बरोबर इतिहासाची नुसती पोपटपंची करूनही चालत नाही. इतिहास हा जसा आहे तसा स्विकारावा लागतो आणि जसा आहे तसा सत्य सांगावाही लागतो, असं असेल तरच त्या इतिहासाची भिडस्त तरुणांना ऊर्जा देते, अन्यथा तो इतिहास पोथीनिष्ठ होतो. आणि पोथीनिष्ठ झालेला इतिहास हा समाजाला दिशा देत नाही, वस्तुनिष्ठ इतिहासाने दिशा पक्की होते. दशा बदलेल हरकत नाही पण दिशा बदलून चालत नाही.
आजचे काही व्याख्याते हे इतिहासाची केवळ पोपटपंची करतात, पण बलिदान मास पाळणारा प्रत्येक शिवशंभू भक्त हा सकृतपने शिवशंभू विचार जगत असतो. त्या धर्म शौर्याचे स्मरण करत असतो. शंभुंचा इतिहास जशाचा तसा महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला माहिती व्हावा ह्याच उद्देशाने शंभु भक्त हा बलिदान मास पाळत असतात…
मागील तीस दिवसापासून बलिदान मास पाळणारा तरुण कुणी पायात चप्पल घालणे सोडलेले आहे, कुणी साखर सोडली, कुणी मुंडण केलं, कुणी गोडधोड बंद केलं, कुणी मंगल प्रसंगी जान बंद केलं, कुणी शंभु चरित्र पठण केलं, कुणी केवळ मौन धारण केलं, कुणी शंभु गडावर चिंतन केलं, कुणी इतिहासच चिंतन केलं. ज्याला ज्याला म्हणून शक्य होतं ते ते आमचा महाराष्ट्रीय तरुण शंभु चिंतन करीत होता. आय.आय.टी. क्षेत्रातील तरुण, प्राध्यापक, अध्यापक, डॉक्टर, वकील, काही प्रामाणिक राजकीय तरुण नेते ह्यांनी देखील त्यांना न शोभणारे, किंवा आजच्या ह्या झगमगाट मध्ये न पटणारे हे नियम पाळले, त्याच्यामागे कर्मकांड नव्हत. त्यामागे होता प्रामाणिक शंभु विचार. ह्या राष्ट्राचा उद्धार आणि ह्या राष्ट्र कार्यासाठी लागणारी प्रामाणिक तळमळ असणारा हा तरुण ह्यातून सापडतो.
आजच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात जग उत्तुंग प्रगती करत असताना आमचा महाराष्ट्रीय तरुण भारत भूमीला आपली माता, शिवशंभूला आपला आदर्श आणि भगव्या ध्वजाला आपला गुरु मानतो आणि हा विचार मानणारा आजचा तरुण, ह्या डाव्या चळवळीला आणि राष्ट्र विरोधी शक्तीला दहशत निर्माण करणारा आहे. ह्या सर्व ‘इको सिस्टम’ची मुळ अडचण ही आहे. आज फाल्गुन अमावस्या आहे आजच्या दिवसाला शंभु प्रेमी “मृत्युंजय अमावस्या” असं म्हणतात, चाळीस दिवसाच्या यमयातना, निर्भित्सना ज्या छञपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या धर्मकार्यासाठी अविरत स्वीकारल्या त्यांची आज ह्याच दिवशी धर्मासाठी आहुती पडली. शंभू राजेंची पडलेली आहुती आम्हा महाराष्ट्रीय तरुणांसाठी सदैव प्रेरणा घेऊन ह्या राष्ट्रासाठी सदैव तत्पर राहील अशी आजची स्थिती आहे. इतिहास हा सदैव तेवत ठेवावा लागतो. आणि हा बलिदान मास तेच कार्य मोठ्या ऊर्जेने करतो आहे. शंभूचे धर्मशौर्य स्मरण करीत कृतज्ञ अंतःकरणाने आणि जड मनाने नमन करतो…
(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)