मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील भोसी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने ओढ्यांना व नदीला मोठा पूर आला. या पावसात एका ओढ्याला आलेल्या पुरात भोसी येथील महिला वाहून गेली. सदरील महिलेचा मृतदेह नंदगाव परिसरातील सिद्ध नदीकाठी आढळून आला. ही घटना 25 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
कोंडाबाई बाबुराव चिबडे (वय 51 वर्ष रा. भोसी तालुका औंढा नागनाथ) असे पुरात सापडलेल्या महिलेचे नाव आहे. कोंडाबाई चिभडे यांचे जांभरून तांडा शिवारात शेत आहे. 25 जुलै रोजी शेतात फवारणी करण्यासाठी त्या गेल्या असता सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली व ओढ्यास पूर आला.
या पुरातून कोंडाबाई व त्यांचा मुलगा मोटार सायकलहून घराकडे जात असताना पुरात मोटार सायकलसह ते वाहून गेले. यामध्ये मुलगा पुराच्या बाहेर ताबडतोब निघाला. परंतु मोटार सायकल व महिला यामध्ये वाहून गेले. सदरील ओढा नांदगाव परिसरात सिद्ध नदीला येऊन मिळतो.
दुसऱ्या दिवशी 26 जुलै रोजी सकाळी नंदगाव व भोसी शिवेलगत वाहणाऱ्या सिद्ध नदीकाठी या महिलेचा मृतदेह व मोटार सायकल आढळून आला.
सदरील महिलेचा मृतदेह औंढा नागनाथ येथे क्षवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
सध्या पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील नदी – नाले, ओढ्याला पूर येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांनी कोणतीही घाई न करता पुराच्या पाण्यातून यजा करू नये. आपल्या जीवावर बेतू शकते. असे आवाहन मार्मिक महाराष्ट्र समूहाकडून करण्यात येत आहे.