Marmik
दर्पण

“एक तरी मित्र असावा..!”

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

समाजात आध्यात्माची आणि श्रद्धेची बीज पेरणारी मंडळी आत्महत्या करू लागली आहेत. ते असे करत असतील तर सामान्य मानव काय विचार करेल सांगा. पण ते ही एक माणसचं असतात अनेकवेळा हे ते सामान्य माणसं विसरतात. समाजामध्ये एखाद्याची उंची वाढत जाते, ती उंची त्याच्या सामाजिक समर्पणाने आणि विद्वत्तेने, त्याच्यातील प्रज्ञा आणि प्रतिभेने, असलेल्या साधनेने वाढते. तशाच समाजाच्या अपेक्षाही त्यांच्याकडून वाढत जातात. समाजाच्या अपेक्षा वाढल्या की त्या दृष्टीने त्या यशस्वी माणसाची वाटचाल निश्चल होत जाते. सामाजिक उंची वाढली की, सार्वजनिक जीवन जगणाऱ्या त्या माणसांना आपल स्वतःचं दुःख, हे सार्वजनिक करता येत नाहीत. आणि अशा माणसांची कात्री होते ती इथेच. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. या निमित्ताने समाजाला आरसा दाखवून देण्यासाठी हा लेख प्रपंच.

…सकाळीच एक अत्यंत दुर्दैवी बातमी कानावर आली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराज ह्यांचे थेट अकरावे वंशज कीर्तनकार शिरीष महाराज मोरे ह्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. फार वाईट वाटलं. अगोदर भय्युजी महाराज देशमुख नंतर एक संवेदनशील अभिनेता सुशांत राजपूत ह्यांच्या आत्महत्येनंतर ही बातमी खुप क्लेश देणारी आहे. समाजाला आध्यात्माची आणि श्रद्धेची बीज पेरणारी ही मंडळी अशा पद्धतीने आत्महत्या करत असतील तर सामान्य मानव काय विचार करेल सांगा. पण ते ही एक माणसचं असतात अनेकवेळा हे ते सामान्य माणसं विसरतात.

समाजामध्ये एखाद्याची उंची वाढत जाते, ती उंची त्याच्या सामाजिक समर्पणाने आणि विद्वत्तेने, त्याच्यातील प्रज्ञा आणि प्रतिभेने, असलेल्या साधनेने वाढते. तशाच समाजाच्या अपेक्षाही त्यांच्याकडून वाढत जातात. समाजाच्या अपेक्षा वाढल्या की त्या दृष्टीने त्या यशस्वी माणसाची वाटचाल निश्चल होत जाते. सामाजिक उंची वाढली की, सार्वजनिक जीवन जगणाऱ्या त्या माणसांना आपल स्वतःचं दुःख, हे सार्वजनिक करता येत नाहीत. आणि अशा माणसांची कात्री होते ती इथेच. समाजाची अश्रू पुसण्याची कुवत असणारा दुःखी असू शकतो ह्याला समाज मान्यता देत नाही. समाजाला ते पटतही नाही, समाज त्याला एक सामान्य माणूस म्हणून नाही तर असामान्य व्यक्ती म्हणून पाहतो.

अशी ही समाजाच्या दृष्टीने असामान्य माणसं समाजाच्या पुष्कळ जवळ जातात. समाजासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते, नव्हे ते करतातही. समाजाच्या मनावर त्यांच्या प्रतिभेचा आणि प्रज्ञेचं प्रचंड मोठं गारूड असतं, पण समाजात रुळलेली माणसं स्वतः पासून मात्र कोसो दूर जातात. ह्यांना सार्वजनिक तर होता येतं, पण ह्यांना ह्यांचं दुःख मात्र सार्वजनिक करता येत नाही, कुणाजवळ ह्यांना मोकळं होता येत नाही. कारण हे माणसं समाजाचा आरसा, किंवा चेहरा बनलेले असतात. कुणी ह्यांचा मित्र नसतो, आपलेपणाने कुणाजवळ ह्यांना रिक्त होता येत नाही.

समाजाच्या जवळ गेलेल्या, पण स्वतःपासून दूर गेलेल्या माणसांना मृत्यू आपला सखा वाटतो, ते त्यालाच कवटाळतात. म्हणून कधी कधी आयुष्यात आपली प्रतिभा, प्रतिमा, प्रज्ञा, विद्वत्ता, हे सर्व बाजूला सारून मोकळ होता यावं, तिथं रिक्त होता यावं, मनमोकळा संवाद तो हो आंतरिक करता यावा, असा एखादा मित्र असावा. जिथं पूर्ण आपल्याला आपला स्वतःचा पारदर्शक चेहरा दिसावा असा मित्र असावा… आध्यात्मिक उंची गाठलेले महाराज भय्यूजी असुदेत किंवा सनातन धर्माचा, वारकरी संप्रदायाचा भगवा पताका खांद्यावर घेऊन जाणं ज्यांना आजपर्यंतच्या आयुष्यात जमलं होतं ते युवा कीर्तनकार शिरीष महाराज असू देत ह्यांना समाजाचं होता आलं, पण ह्यांना पारदर्शक मित्र मिळवता आलाच असेल असं मला वाटतं नाही.

आत्महत्या कुणाला आणि कधीच पर्याय असू शकतं नाही. यशाची सर्व कवाडं समाजाच्या दृष्टीने उघडी असताना, समाजाच्या दृष्टीने मोठी उंची म्हणजे सुखाची आरास असं असताना, असे प्रसंग अशा व्यक्तीच्या बाबतीत जेंव्हा येतात तेंव्हा माझ्यासारखा सामान्य मानवी सुखाचा खरा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. खऱ्या सुखात आपला पैसा, पद, प्रतिष्ठा, सौंदर्य, सत्ता, सामाजिक उंची, कमावलेली संपत्ती कधीच कामी येत नाही. कामी येते ती फक्त मनाची प्रसन्नता.

जगण्यातली पारदर्शकता आणि मनापासून खळखळून हसताना निरागस असावा असा सात्विक चेहरा म्हणजे जीवन. ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञि भारतरत्न लताबाई मंगेशकर एकदा एका मुलाखतीत म्हणल्या होत्या “मी पुढच्या जन्मात लता मंगेशकर होण पसंत नाही करणार!” ह्याचा अर्थ काय, लताबाईंना काय कमी होतं, पण तरीही त्यांना परत लता मंगेशकर बनायचं नाही. म्हणजे ही उंची तुमचं जगणं कमी करते, आयुष्याची मौज कमी करते. ह्याचा अर्थ उंची वाढू नये, प्रतिष्ठा कमावू नये, पैसा मिळवू नये असा होत नाही. हे करत असताना आपल्याला मोकळं होता यावं असा एखादा मित्र कमावता यावा. ज्याच्या हक्काच्या शिव्यांनी मनातील आपल्या मळभ निघावा.

आत्महत्यांची कारणं अनेक असतात. भौतिक सुखाच्या शोधात माणसं वास्तवापासून दूर चाललेत हे ही सत्य आहे. अर्थात हा नियम ह्या वरील दोन्ही आध्यात्मिक उंची गाठलेल्या मंडळींना लागू होत नसला तरी, एका अहवाला नुसार दरवर्षी दहा लाख लोकं आत्महत्या करतात. त्यातील मुख्य आणि बहुतांशी ह्याच विषयाशी निगडित असतात. भौतिक सुखं शोधतांना वास्तव विसरणारे देखील आत्महत्यांचे शिकार बनतात. त्यांनाही वास्तवाचं दर्शन करून देणारा मित्र मिळत नाही म्हणा, किंवा त्यांना तो मित्र कमवता येत नाही असं म्हणा. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्य, किंवा स्वतःच्या मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमध्ये जखडून आत्महत्या करतात.

वैफल्यग्रस्त मनस्थिती, अनेच्छिक ब्रह्मचर्य, छिन्नमनस्कता, अतिशय मद्यपान, अगदी आज न होणारे किंवा अती विलंब होणारे विवाह, किंवा नंतरचे विवाहबाह्य सबंध, अन्य नशाच्या पदार्थाचे सेवन आणि विषयाचा आत्यंतिक उन्माद, ह्यासह मानसिक तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेले अपयश, संकटे, वयक्तिक नात्यांमधील गुंते, हे ही आत्महत्येची प्रमुख कारणं असू शकतात. पण हे काहीही असलं तरी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. तरी हे टाळण्यासाठी मला ह्या सर्वांना प्रभावी उपाय एकच आहे असं वाटतं. आपल्याला आपल्या एखाद्या जिवलगाकडे व्यक्त होता आलं पाहिजे आणि त्याला मैत्रीची चांगली झालर असणारा एक पारदर्शक मित्र असावा…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

राजकारण्यांकडून जनतेची दिशाभूल !

Gajanan Jogdand

भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ कित्ता कोणीही गिरवावा…

Gajanan Jogdand

प्रिय दाजीस…!

Gajanan Jogdand

Leave a Comment