मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – राज्यातील सरकार हे गोरगरीब, सर्वसामान्यांचे असून त्यांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला काढाव्यात असलेल्या रिक्त जागा आम्ही तातडीने भरणार आहोत. त्यातही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागातील 80 हजार पदांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील असे सांगून उपस्थित तरुणांना तयारीला लागा असे आवाहनही केले. तसेच शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्तताही केल्या जातील, असे आश्वासन दिले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रामुख्याने होती. सदरील मागणी आणखी एक आढावा घेतल्यानंतर तातडीने सोडविली जाईल असे सांगितले. तसेच औंढा नागनाथ येथील लिगो प्रकल्पासाठी केंद्राकडे मदत मागितली जाईल ,कळमनुरी येथील शेळी मेंढी पालनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्याचप्रमाणे आदिवासी कार्यालयासाठी पाच कोटी रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केला.
तसेच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र, नरसी नामदेव तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या लमान देव साठी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष (दादा) बांगर, हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री राठोड, आमदार विप्लव बाजोरिया, माजी खासदार शिवाजीराव माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार रामराव वडकुते, युवा सेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, महिला आघाडीच्या रेखाताई देवकते आदींची उपस्थिती होती.
आमदार संतोष बांगर हा माझा चेला…
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष दादा बांगर यांचे तोंड भरून कौतुक करत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांचा हा ढाण्या वाघ निर्णायक वेळी माझ्याकडे आला. त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला. संतोष बांगर ते माझा चेला आहे, असे सांगून हिंगोली जिल्ह्याला काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
…म्हणून आम्ही बंड केले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ज्या पक्षांनी त्रास दिला, त्यांच्यावर कारवाई केली शिवसैनिकांवर कारवाई केली, अशा पक्षासोबत आम्हाला जावे लागले तर शिवसेनेची सत्ता असतानाही सर्वसामान्य शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत होती. आर्थिक पाठबळाची गरज असताना ते मिळत नव्हते. पक्षातील वरिष्ठांकडून महा विकास आघाडीचे सरकार आहे असे सांगून ऍडजेस्ट करण्यास सांगितले जात होते. तसेच जनतेने भाजप आणि शिवसेनेला भरभरून मते दिलेली असताना बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे जात नव्हता. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही बंद केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.