मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध धंद्यांबाबत कठोर भूमिका घेत मागील काही दिवसांपासून अवैध धंदे व सराईत गुन्हेगार तपासणी व प्रतिबंधक कार्यवाही यावर भर देत कार्यवाही सुरुवात केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी आज रोजी वसमत तालुक्यातील राहणारे सराईत गुन्हेगार सुदर्शन मोहन शिंदे व 35 वर्ष योगेश गुलाबसिंग पवार व पस्तीस वर्ष सचिन मोहन शिंदे व तीस वर्षे (सर्व राहणार पळशी तालुका वसमत) यांच्याविरुद्ध हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस ठाणे, हट्टा पोलीस ठाणे, परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलीस ठाणे व नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलीस ठाणे, उमरी पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, जबरी चोरी व शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून नमूद त्यांनी आरोपी हे सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.
त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास तसेच संपत्ती धोका उत्पन्न होत असल्याने पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी सदर प्रकरणी प्रतिबंधक कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरून हट्टा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे यांनी नमूद आरोपीं विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपरीचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केल्यावरून नमूद प्रकरणी सविस्तर करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये तिन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षांसाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबत आदेश काढले आहेत.
नमूद आरोपी हे तात्काळ हिंगोली जिल्ह्यातून निघून जातील. तसेच पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार नाहीत असे आदेशात नमूद केले आहे.
गुन्हेगारी वस्ती व संवेदनशील ठिकाणी होणार व्यापक प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दररोज स्थानिक गुन्हे शाखा व सर्वच पोलीस ठाण्यांकडून अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येत असून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक आठवड्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात गुन्हेगारी वस्ती व संवेदनशील ठिकाणी व्यापक प्रमाणात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. तसेच कारागृहातून रजेवर आलेले व परत कारागृहात परत न गेलेले तसेच हद्दपार आदेश होऊनही त्याच भागात राहणाऱ्या इसमान विरुद्ध ही पोलिसांकडून नियमित तपासणी करून कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी सुरू केलेल्या या मोहिमेवरून जिल्ह्यातील अवैध धंदेवाले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.