Marmik
Hingoli live News

लिंबाळा प्रवाह येथे स्वच्छतेचे तीन तेरा! नाल्या बुजल्या, सांडपाणी रस्त्यावर; गावाचे आरोग्य धोक्यात

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा प्रवाह गावातील मुख्य रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – तालुक्यातील लिंबाळा प्रवाह येथे स्वच्छतेचे तीन तेरा झाले असून कित्येक महिन्यांपासून स्वच्छतेच्या नावाने वराती मागे घोडे काढले जात आहेत, मात्र गावात काडीचीही स्वच्छता नसून गावातील बहुतांश नाल्या बुजल्या आहेत परिणामी नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून रस्ता चिखलमय होत आहे. तसेच सांडपाण्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके सासून त्यात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी गावात रोगराई पसरण्याची भीती असून या दुर्गंधीने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हिंगोली तालुक्यातील पेनगंगा नदी किनारी वसलेल्या लिंबाळा प्रवाह गावची दयनीय अवस्था झालेली आहे. गावात स्वच्छतेच्या नावाने शिमगा खेळायला जात आहे या गावात कधीही आणि कोणत्याही ऋतूत गेले तरी गावात कुठेही स्वच्छता दिसून येत नाही. गावातील नाल्या केरकचरा व प्लास्टिकने बुजून गेल्या असून ग्रामपंचायतीला या नाल्या मोकळ्या करण्याचीच विसर पडल्याचे दिसते.

मागील कित्येक वर्षांपासून गावातील हे चित्र कायम असून स्वच्छतेच्या नावाखाली ग्रामपंचायतीने आत्तापर्यंतचा निधी केला तरी काय असा प्रश्न पडतो. गावातील नाल्या बुजून गेल्याने नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावरून गावात सर्वत्र वाहत आहे.

या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनधारकांना व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वाहनांच्या ये जाणे तसेच रोडवर अनेक ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने तळे होत आहे. यात डासांची उत्पत्ती होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. तसेच दुर्गंधी सुटत असून गावात जाताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते. एखादा पाहुणा आला तर त्यासही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

शासनाकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 हे अभियान राबविण्यास सुरुवात झालेली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केलेले आहे, मात्र त्यांच्या या आवाहनाला अनेक ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखवल्याचे यावरून दिसते.

लिंबाळा प्रवाह ग्रामपंचायत ने आत्तापर्यंत स्वच्छतेकडे पाठ फिरविलेली असून स्वच्छतेच्या नावाने आलेल्या निधीचे केले काय असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला आहे.

गावातील अस्वच्छतेला व या सांडपाण्याला ग्रामस्थ वैतागले असून सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे तसेच गावात स्वच्छता ठेवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत; मात्र ग्रामपंचायती व ग्रामसेवक हे याकडे दुर्लक्ष करत असून जिल्हा परिषद पंचायत समिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आत्माराम बोंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या ऐकाव्यात व दोषी ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Related posts

अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण ; सकल मराठा समाजाकडून उद्याचे आंदोलन शांततामय मार्गाने करण्याचे आश्वासन

Santosh Awchar

वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम; रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहांतर्गत प्रभावी जनजागृती कार्यक्रम

Santosh Awchar

वर्कशॉप, शेतातील मोटार व इतर साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment