मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गुगुळ पिंपरी येथील दोन सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. याबाबत हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आदेश काढले आहेत.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत आहेत. तसेच असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज रोजी गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गुगुळ पिंपरी गावातील राहणारे सराईत गुन्हेगार अशोक दगडू इंगोले (वय 58 वर्षे) व प्रकाश अशोक इंगोले (वय 32 वर्ष, दोन्ही रा. गुगुळ पिंपरी ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल असून ते सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.
त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत असल्याने हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंधक कार्यवाही बाबत आदेश दिले होते.
यावरून गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील यांनी नमूद आरोपीविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर करून नमूद आरोपीच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.
यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वय नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.