मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहर आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक जण स्वतःकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ऑनलाईन दंड लागू नये म्हणून चुकीचा पासिंग नंबर असलेली नंबर प्लेट लावून वाहन वापरत असल्याचे हिंगोली शहर वाहतूक शाखा यांच्या निदर्शनास आले आहे. असा चुकीचा नंबर वापरणाऱ्या दोघांवर भादंवि कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 सप्टेंबर रोजी हिंगोली शहर वाहतूक शाखेतील पोलिसांमलदार गजानन राठोड हे महात्मा गांधी चौक येथे कर्तव्य बजावत असताना आरोपी मारुती ग्यानबा चंद्रवंशी याने आपल्या ताब्यातील मोटार सायकलवर चुकीचा नंबर टाकून वाहनावरील ऑनलाईन दंड दुसऱ्याला जावा म्हणून मोटरसायकल वापरत असल्याचे निदर्शनास आले.
यावरून आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत हिंगोली शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार सुभाष घुगे हे सावरकर नगर चौकात कर्तव्य बजावत असताना आरोपी शिवाजी कैलास गडदे (रा. खर्डा) याने आपल्या ताब्यातील मोटरसायकलवर चुकीचा नंबर टाकून वाहनावरील ऑनलाईन दंड दुसऱ्याला जावा म्हणून मोटरसायकल वापरत असल्याचे निदर्शनास आले.
यावरून आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतरही बनावत नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध अधिक कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी सांगितले आहे.
ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक पाडळकर, वाहतूक शाखेतील सर्व अंमलदार यांनी केली.