मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. यावेळी पथकाने वाळूसह ट्रॅक्टर असा एकूण 13 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ट्रॅक्टर चालक मालकांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात भादंविसह कलम 48 (7)(8) महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 8 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड करणे व अवैध धंद्याविरोधात कार्यवाहीसाठी हट्टा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
यावेळी पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नालेगाव शिवारात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अवैधरीत्या व विनापरवाना वाळूची वाहतूक होत आहे, अशी माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नालेगाव शिवारात सापळा रचून अवैधरीत्या व विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ज्याला पासिंग नंबर नोंद नसलेले ज्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू व दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 13 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच नमूद ट्रॅक्टर वरील चालक अनिल प्रकाश बारसे (रा. जवळाबाजार) व ट्रॅक्टर मालक माधव नारायण पावडे (रा. टाकळगव्हाण) व दुसऱ्या ट्रॅक्टरचा चालक अमोल दिलीप पावडे (रा. टाकळगव्हाण) तसेच ट्रॅक्टर मालक प्रल्हाद वाघ (रा. नालेगाव) यांच्या विरोधात हट्टा पोलीस ठाणे येथे भादंविसह कलम 48 (7)(8) महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर साबळे, अजित सौर, तुषार ठाकरे यांनी केली.