मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – आगामी काळात बैलपोळा, गणेशोत्सव हे सण साजरे होत आहेत. या सणानिमित्त शहरातील अनेक नागरिक घराला कुलूप लावून गावी जातात. या नागरिकांनी बाहेर गावी जाताना घरी चोरी घरफोडी व दरोडा पडू नये म्हणून काळजी घेण्याबाबत हिंगोली जिल्हा पोलिसांकडून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आवाहन केले आहे.
सध्या हिंगोली जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने रात्रीच्या वेळी अनेक रस्ते निर्माण असतात. तसेच विद्युत पुरवठाही खंडित होण्याची शक्यता असते.
मागील काही दिवसात हिंगोली शहरातील रामाकृष्ण नगर, बळसोंड, श्रीकृष्ण नगर, तिरुपती नगर, गंगा नगर या परिसरात बंद घर फोडून चोरी झालेल्या घटना घडल्याचे निदर्शनास येत आहे.
संधीचा फायदा घेऊन गावाच्या किंवा शहराच्या कडेला असलेल्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे आगामी होणाऱ्या सण – उत्सवानिमित्त घर कुलूप बंद करून बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी – घर कुलूप बंद करून बाहेरगावी जाताना ‘शेजारी आपला पहारेकरी’ या म्हणीप्रमाणे आपल्या शेजाऱ्यास आपल्या बंद घरावर लक्ष ठेवण्याबाबत कळवावे.
घराच्या दरवाजा उच्च प्रतीचे कुलूप व कोयंडा लावावा. बाहेरून दिसणारे घरातील लाईट चालू स्थितीत ठेवावे.
शक्य असल्यास आपल्या घराच्या अवती-भवती चांगल्या प्रतीचे (लाईट व्हिजन) सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
आपल्या गल्लीत काहीतरी विक्री करण्याच्या उद्देशाने अनोळखी व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी. शक्य झाल्यास आपला मोबाईल मध्ये त्या व्यक्तीचा फोटो काढून घ्यावा.
बाहेरगावी जाताना संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना कळवावे. शक्य झाल्यास घरातील सोन्या-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू व रोख रखम घरातील कपाटात न ठेवता बँकेत, लॉकर मध्ये ठेवावे. कारण चोरट्यांचे घरातील कपाट हे पहिले टार्गेट असते.
आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील लाईट रात्रीच्या वेळी चालू स्थितीत राहतील याबाबत प्रयत्न करावे.
चोरी केल्यानंतर लवकरात लवकर गावाबाहेर पडता यावे या दृष्टीने गावातील किंवा शहराच्या कडेला असलेली घरे ही चोरट्यांचे टार्गेटवर असतात. त्यामुळे गावाच्या किंवा शहराच्या कडेला असणाऱ्या घरमालकांनी जास्त काळजी घ्यावी.
आपल्या गल्लीत किंवा गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करून आळीपाळीने आपल्या गल्लीत किंवा गावात रात्रगस्त ठेवावी. शक्यतो आपल्या घरात सर्व माणसे बाहेरगावी न जाता एखादा व्यक्ती घरी राहील याबाबत दक्षता घ्यावी.
कोणत्याही वेळेला कोणत्याही मदतीसाठी निःशुल्क 112 नंबर वर कॉल किंवा पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली मोबाईल नं.8669900676 वर संपर्क करून पोलिसांना तात्काळ संशयित चोरट्याची किंवा इतर कोणतीही माहिती द्यावी, असे आवाहन करत हिंगोली पोलीस दल आपल्या सेवेसाठी 24 तास सतर्क आहेत, असे कळविण्यात आले आहे.