मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरून शिक्षकांचा बॅकलॉग तात्काळ पूर्ण करावा, अशी मागणी रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना केले आहे.
महाराष्ट्रात सध्या दहा लाखांहून अधिक डीएड, बीएड धारक उमेदवार नोकरीच्या शोधात वन वन भटकंती करत आहेत. सद्यस्थितीत राज्यात शिक्षकांची सुमारे 31 हजार 472 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढसाळला असून बहुतांशी शिक्षकांवर अतिरिक्त विषयांचा भार पडत आहे.
परिणामी राज्यातील शिक्षणाचा टक्का मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीला शिक्षकांची पदे रिक्त असताना महाराष्ट्र शिक्षण विभाग याकडे कानाडोळा करत आहे. राज्यातील शिक्षकांची भरती 2019 पासून स्थगित आहे.
परिणामी राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा खेळखंडोबा होत आहे. तसेच दिवसेंदिवस डीएड, बीएड धारकांची संख्या वाढत चालली असून दहा लाखांहून अधिक जण डीएड बीएड धारक आहेत. हे सर्वजण नोकरीच्या शोधात असून त्यांना नोकरी मिळत नसल्याने मिळेल ती कामे करावी लागतात.
तसेच शिक्षणाचाही टक्का घसरला असून राज्यातील शिक्षण विभागाने तात्काळ जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, छावणी शाळा या सर्व शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी रयत संकल्प डीएड, डीएड संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.