मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जगभरात 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त हिंगोली पोलिसांकडून जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. अंमली पदार्थ अफु मार्फिन, हेरॉईन, कोकेन, भांग, गांजा, चरस व इतर घातक तंबाखूजन्य पदार्थ असे पदार्थ की ज्यांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, धुंदी येते.
अंमली पदार्थाच्या सेवनाने माणसाच्या शरीरावर विशेषता मेंदूवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्याची क्रेझ अधिक आहे. शासन व विविध संस्थांकडून वेळोवेळी विविध कार्यक्रमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात.
तसेच अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, बाळगणे तसेच सेवन करणे हा गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे अंमलात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः युवकांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये.
त्यांच्या दुष्परिणामांची त्यांना जाणीव असावी म्हणून हिंगोलीच्या डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये दहशतवाद विरोधी शाखा यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारे बॅनर वाहनावर लावून हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ व महाविद्यालय परिसरात जनजागृती केली.
सेनगाव पोलीस ठाणे यांनी तोष्णीवाल महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कवठा पाठी येथे उपस्थितांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कडून शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारे बॅनरसह शहरातून रॅली काढून जनजागृती केली. ग्रामीण व शहरी भागात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे ही चिंताजनक बाब आहे.
केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गरतेत आपोआपच सापडले जात आहेत. आपले जीवन सुंदर आहे, हे एकदाच मिळत असते.
अमली पदार्थ पासून दूर राहून आपले जीवन अधिक सुंदर बनवा, असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.