मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात काल दुपारपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे येलदरी प्रकल्प 76 टक्क्याहून अधिक भरला असून सिद्धेश्वर प्रकल्पही 88 टक्क्याहून अधिक क्षमतेने भरला आहे. या दोन्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने कोणत्याही क्षणी धरणातून वक्र द्वाराने पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसाच्या प्रचंड गर्मी नंतर 7 ऑगस्ट रविवारी दुपारी साडे बारा वाजेपासून हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार सुरूच राहत आहे. रविवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तसेच रात्रभर झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
होत असलेल्या जोरदार पावसामुळे येलदरी प्रकल्प 76.48 टक्के व सिध्देश्वर प्रकल्प 88.42 टक्के भरला असून कोणत्याही क्षणी धरणातून वक्रद्वाराने पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
तसेच कोणीही नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा इत्यादी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमतच्या तहसीलदारांना दिलेल्या आहेत.