मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील सकल मातंग समाजाकडून समाजातील हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द बाळगून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हा उपक्रम राबविला जात असून सेनगाव तालुक्यातील बहीण भावास या उपक्रमांतर्गत इयत्ता 11 वीची पुस्तके वाटप करण्यात आली.
महाराष्ट्रातील मातंग समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीतही प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून अनेक तरुण – तरुणी शिक्षण घेत आहेत.
मात्र त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी बहुतांश कडून सामाजिक अशा स्वरूपाच्या असल्याने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागत आहे.
सदरील बाबत लक्षात घेऊन हिंगोली येथे सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमांतर्गत समाजातील प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शालेय मदत केली जात आहे.
5 सप्टेंबर रोजी या उपक्रमांतर्गत सेनगाव तालुक्यातील माझोड येथील लहुजी आणि सपना माधव रणबावळे या दोघा बहिण भावांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदरील पुस्तके आणि लेखन साहित्य त्यांच्या मागणीनुसार देण्यात आले. हे साहित्य त्यांना गरीब म्हणून नाही तर समाजात देणारे तयार व्हावे या हेतूने देण्यात आले.
याप्रसंगी ‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमाचे अध्यक्ष आत्माराम गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवी थोरात, कोअर कमिटी सदस्य सुशील कसबे, भारतीय बहुजन आघाडीचे अध्यक्ष चव्हाण, उपाध्यक्ष भानुदास खंदारे उपस्थित होते.