Marmik
Bhoomika

वीज जाते- येते, असे का घडते?

अन्न, वस्त्र, निवाऱ्या बरोबर आता वीज ही काळाची मुलभूत गरज झाली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही इतके विजेचे महत्त्व आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीजपुरवठा खंडित होतो. विज पुरवठा खंडित झाला की, आपल्या संतापाचा पारा चढतो! परंतु वीज जाते हे वास्तव आहे. विशेषत: पावसाच्या सुरुवातीला वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीज पुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. त्यांच्या बातम्या येतात, परंतु वीज का गेली? का जाते? या प्रश्नाचे उत्तर बहुतांश जणांना माहिती नसते आणि हेच समजून घेण्याची गरज आहे. वीज का गेली हे जाणून घेऊयात या लेखात.

देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेली वीज प्रत्येकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही.त्यासाठी हजारों किलोमिटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले असुन हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन बिघाड होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्ते अपघात, पूर, व वादळामुळे वाहिन्यावर झाडं पडणे यामुळे वाहिन्यावर मोठ्या प्रमाणात बिघाड होऊन विज यंत्रणा ठप्प होते. कधी कधी एखांदी उच्च दाब वाहिनी कोसळली तर गावच्या गाव किंवा काही तालुके सुध्दा अंधारात जातात, तर हा बिघाड काही वेळा गाव किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो.

दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची म्हणजे वीज वाहिन्यांचे पूर्ण जाळे हे पोल म्हणजेच खांबावर फिरलेले असते. सदर खांबामध्ये वीज प्रवाह उतरू नये यासाठी त्यावर चिनी मातीचे चॉकलेटी रंगाचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बऱ्याच वेळा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीज प्रवाहामुळे गरम होतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात.

ज्यामुळे वीज प्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लागलीच आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन उपकेंद्रा मधील (विज वाहिनी) फिडर बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता अधिक असते. उपकेंद्रात कार्यरत असलेला कर्मचारी थोड्यावेळाने पुन्हा एकदा फिडर चालु करण्याचा प्रयत्न करतो.

जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र वाहिनीवर बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तसेच संबंधितांना मॅसेज देऊन फोन करून सदर घटनेची माहिती दिली जाते. त्यांनतर दिवस असो की रात्र ऊन वारा,वादळी पाऊस कशाचीही तमा न बाळगता शोध मोहीम हाती घेतले जाते. कधी बंद पडलेल्या वाहिन्यावरील सर्व खांब तपासावे लागतात तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो.

विज वाहीण्यावरील बिघाड शोधणे म्हणजे अत्यंत जिकरीचे आहे. विजय यंत्रणा अशी आहे की चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते, शिवाय धोका असतो मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही, त्यांचे एकदा कनेक्शन घेतले की, त्यांची सेवा सदर कंपनीला एका ठिकाणी बसून चालु अथवा बंद करता येते तीही कोणत्याही जोखमी शिवाय वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे.जर रात्री अपरात्री गेलेली विज काही वेळात परत येत असते,तेव्हा कुठेतरी त्या पावसात किंवा अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणीतरी खांबावर चढलेला असतो.तेव्हा कुठे वीज येते.

वाहिन्यांवरील बिघाड शोधणे म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी युद्धासारखेच आहे, रोज नवनवीन बिघाड होत असतो, इथे चुकीला माफी नाही, चूक झाली की जीव जाणार हे लक्षात ठेवूनच खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊन सुद्धा कधी कधी वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होऊन जीवास मुकावे लागते.

त्यामुळे वीज कर्मचारी देखील कोणाचा भाऊ, मुलगा, वडील, आणि आपल्यातीलच एक परंतु या धावपळीच्या आयुष्यामध्ये मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की एखाद्याच्या जीवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही वीज जाते, आणि येते, यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू तसेच आपण महावितरण यंत्रणेला दोष देण्यापेक्षा त्यांच्यातील गुंतागुंत समजून घेऊ तेव्हां कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला किंवा वीज यंत्रणेला दोष देणार नाहीत हे मात्र नक्की.

वीज ग्राहकांनी घ्यावयाची काळजी

विजेच्या खांबाला किंवा स्टेला जनावरे बांधू नये.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात विजेचे खांब पडले किंवा विजेच्या तारा तुटुन पडलेल्या असतील तर त्याला स्पर्श करू नये तसेच इतरांचाही स्पर्श होणार नाही यासाठी सर्वांना जागरूक राहावे.व सदर घटनेची माहिती संबंधित वीज कार्यालयाला द्यावी.

सर्व्हिस वायरला जॉइंट ठेऊ नये, तसेच अखंड वायरचां वापर करावा.

धातूची शिडी, गज, सळ्या यांची वाहतूक करतांना वीज तारांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

घरामधे ई. एल. सी.बी.चां वापर करावा.

घरातील लाईट फिटिंग अधिकृत परवानाधारक यांच्याकडूनच करून घ्यावी, तसेच स्वतंत्र अर्थिंग करुन घ्यावी.

आय. एस. आय. मार्क प्रमाणित उपकरणांचा वापर करावा.

सिताराम भिमराव खंडागळे
(वरिष्ठ तंत्रज्ञ)
महावितरण कोपरगांव ग्रा. उपविभाग.

Related posts

अग्नीपथचा विरोध नेमका कशासाठी?

Mule

हिंगोली जिल्ह्यातील धरणग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत..

Gajanan Jogdand

हळूहळू होऊ लागलाय कल्याणकारी राज्ये ‘संकल्पनेचा’ लिलाव!!

Gajanan Jogdand

Leave a Comment