मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – स्वयंसहायता समूहातील महिलांनी सक्षम झाले पाहिजे, समूहाने तयार केलेले खाद्यपदार्थ, शोभेची वस्तू शिवणकाम केलेले कपडे परदेशात विक्रीसाठी पाठवावे यासाठी स्वयं समूहाला शासन सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे असल्याचे राज्याचे गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत राज्यस्तरीय मिनी सरस आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थाचे भव्य व विक्री 9, 10 व 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले आहे.
आज या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास वर्ग कल्याण मंत्री माननीय अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्धड, आमदार हरिभाऊजी बागडे, विक्रमजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले उपस्थित होते.
याप्रसंगी स्वयंसहायता समूहातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा माननीय मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वयंसहायता समूहाने गणेशोत्सवात स्टॉल लावून उत्कृष्टपणे काम केलेले आहे. यापुढे त्यांनी याच पद्धतीने काम करावे आपला बचत गट सक्षम बनविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण 18000 बचत गट असून त्यांना खेळते भांडवल स्वरूपात 15 ते 16 कोटी देण्यात आल्याचे प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी नमूद केले.
स्वयंसहायता समूहातील महिलांच्या गटांनी जी – 20 मध्ये परदेशी पाहुणे समोर उत्कृष्टपणे सादरीकरण केले. तसेच गावातील महिला स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन मध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. छोट्या उद्योगासाठी स्वयंसहायता समूहाने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शनात आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.
स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे व समूहाने दर्जेदार उत्पादन करण्याचे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले. यावेळी स्वयंसहायता समूहातील महिला गंगासागर पडोळ, रेखा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यातील 14 जिल्ह्याचे 75 स्टॉल येथे उभारण्यात आलेले आहेत.
यानंतर उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेतला. यावेळी रामू (काका) शेळके, राजू शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक सुहास वाकचौरे, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत विरगावकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, मार्केटिंग व्यवस्थापक सचिन सोनवणे, सुचिता खोतकर तसेच स्वयंसहायता समूहातील महिला तालुका व जिल्हा स्तरावरील उमेद व जिल्हा परिषद चे कर्मचारी उपस्थित होते